पुणे प्रतिनिधी : ज्योतिबा सावंत
आंबेगाव बुद्रुक येथील श्रीराम मंदिराजवळ, जिल्हा परिषद शाळेच्या मागील परिसरातील नागरी समस्यांची पाहणी करण्यासाठी नव्याने निवडून आलेल्या नगरसेविका सौ. प्रतिभाताई चोरघे व त्यांचे पती श्री. रोहिदास बापू चोरघे हे प्रत्यक्ष स्थळी उपस्थित होते.
या पाहणीदरम्यान परिसरात ड्रेनेजचे झाकण पूर्णतः उघडे असल्याचे निदर्शनास आले. ही बाब अत्यंत धोकादायक असून नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण होऊ शकतो, हे लक्षात घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने झाकण बसवण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या.
तसेच या भागात पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या असून नागरिकांना कमी दाबाने तसेच रात्री अपरात्री पाणी येत असल्याची तक्रार आहे. या संदर्भातही पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना तातडीने सुधारणा करण्याचे निर्देश देण्यात आले.
याशिवाय परिसरात असलेला सरकारी दवाखाना अत्यंत कमी जागेत कार्यरत असून, वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत अपुरा पडत आहे. त्यामुळे दवाखान्याची इमारत मोठी करण्यासंदर्भात अधिकृत पत्रव्यवहार करण्यात आला असल्याची माहिती देण्यात आली.
या वेळी माजी ग्रामपंचायत सदस्य अतुल दांगट, सागर मोझर, संतोष नाटकर, सचिन वाल्लेकर, समीर वासवंड व सचिन दांगट हेही उपस्थित होते.
पाहणीदरम्यान संबंधित कर्मचारी व अधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेऊन सर्व अडचणी त्वरित दूर करण्याचे आदेश नगरसेविका सौ. प्रतिभाताई चोरघे व रोहिदास बापू चोरघे यांनी दिले.
या कामकाजाबद्दल स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून,
“रोहिदास बापू चोरघे हे प्रभाग क्रमांक ३८ मधील प्रत्येक समस्या लक्षात ठेवून, वैयक्तिक लक्ष घालून सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहेत,” अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे.











