April 23, 2026 10:29 pm

‘पिफ’मध्ये यावर्षी तब्बल ४५ महिला दिग्दर्शकांचे चित्रपट

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

पुणे : पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवा(पिफ)त यावर्षी महिला दिग्दर्शकांची खूप मोठी संख्या असून, १३० चित्रपटांपैकी ४५ महिला दिग्दर्शकांच्या चित्रपटांची निवड करण्यात आली आहे. जागतिक चित्रपट स्पर्धा, ग्लोबल सिनेमा, भारतीय चित्रपट, आणि माहितीपट अशा विविध विभागांत या चित्रपटांचा समावेश आहे.

 

 

 

महोत्सवाच्या जागतिक चित्रपट स्पर्धा विभागात सहा महिला दिग्दर्शिकांचे चित्रपट दाखवले जाणार आहेत. बेल्जियमच्या दिग्दर्शिका व पटकथा लेखिका लॉरा वँडेल यांचा ‘अ‍ॅडम्स सेक’ हा चित्रपट किशोरवयीन मुलाच्या मानसिक गुंतागुंतीतून आई–मुलाच्या नात्याचा शोध घेतो. कॅनेडियन दिग्दर्शिका सोफी रोमवारी यांचा ‘ब्लू हेरॉन’ स्थलांतराच्या अनुभवावर आधारित आहे. फ्रेंच दिग्दर्शिका पॉलीन लोक्वेस यांचा ‘निनो’ हा चित्रपट घशाच्या कर्करोगाशी झुंज देणाऱ्या तरुणाची कथा मांडतो. हंगेरीच्या दिग्दर्शिका इल्डिको एन्येदी यांचा ‘सायलेंट फ्रेंड’ तीन वेगवेगळ्या कालखंडांतील कथा एका झाडाच्या अस्तित्वाभोवती गुंफतो, तर ऑस्ट्रियन दिग्दर्शिका एल्सा क्रेम्सर यांचा ‘व्हाइट स्नेल’ दोन व्यक्तींमधील नातेसंबंधांवर आधारित आहे. तसेच ‘ धीस इज माय नाईट’, हा हदीह लैला ती या दिग्दर्शिकेचा मुलगी आणि वडील यांच्या नात्यावर आधारित चित्रपटाचा समावेश आहे.

 

ग्लोबल सिनेमा विभागात महिला दिग्दर्शिकांच्या २९ चित्रपटांची निवड झाली आहे. त्यात ‘लूझ’ (फ्लोरा लाऊ), ‘पिंच’ (उत्तरा सिंग), ‘कारवाँ’ (झुजाना किचनेरोव्हा), ‘नो वे बॅक’ (नथाली नाजेम) आणि ‘साउंड ऑफ फॉलिंग’ (माशा शिलिन्स्की) यांसारखे चित्रपट वास्तविक घटना,कौटुंबिक नाती, सामाजिक तणाव आणि वैयक्तिक स्वातंत्र्य या विषयांना स्पर्श करतात.

 

 

 

 

 

आसामच्या दिग्दर्शिका मंजू बोरा यांचा ‘मर्डर्स टू क्लोज – लव्ह टू फार’ हा भारत–इस्रायल सहनिर्मितीतील चित्रपट, प्रेमसंबंध, हत्या आणि राजकीय संघर्ष यांवर आधारित आहे. हा चित्रपट मंजू बोरा आणि इस्रायलचे दिग्दर्शक डॅन वोलमन यांनी संयुक्तपणे दिग्दर्शित केला असून, माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाने (एनएफडीसी) या चित्रपटाला पाठबळ दिले आहे. परदेशी निर्मिती संस्थेच्या सहभागामुळे हा आसामी चित्रपटसृष्टीतील महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.

 

महाराष्ट्रातील दिग्दर्शिका ईशा पुंगलिया यांचा ‘ओस्लो : अ टेल ऑफ प्रॉमिस’ हा माहितीपट चित्रपट महोत्सवात दाखवला जाणार आहे. अभिनेता जॉन अब्राहम यांनी या चित्रपटाची निर्मिती व सादरीकरण केले आहे. तसेच, जिजीविशा काळे यांचा ‘मदरहूड – तिघी’ हा चित्रपट मराठी चित्रपट स्पर्धा विभागातून निवडण्यात आला आहे. जो स्त्रियांच्या जीवनाबद्दल विविध पैलू मांडतो. “यावर्षी पिफमध्ये महिला दिग्दर्शकांची संख्या वाढणे ही अत्यंत सकारात्मक बाब आहे. मराठी चित्रपटसृष्टीत महिलांची सर्जनशील उपस्थिती वाढणं गरजेचे आहे. भविष्यात विविध महिला कलाकार आणि तांत्रिक सहकाऱ्यांसोबत एकत्रितपणे काम करण्याची माझी इच्छा आहे,” असे तिघी चित्रपटाच्या दिग्दर्शिका जिजीविशा काळे यांनी सांगितले.

भारतीय चित्रपट विभागात दिग्दर्शिका शिवरंजिनी जे. यांचा मल्याळम चित्रपट ‘व्हिक्टोरिया’ दाखवला जाणार आहे. याच विभागात तनुश्री दास यांनी सह-दिग्दर्शित केलेला ‘शॅडोबॉक्स’ हा बंगाली भाषेतील नाट्यपट असून, त्यांचे हे दिग्दर्शकीय पदार्पण आहे.

 

“चित्रपट क्षेत्रात महिला दिग्दर्शकांची संख्या वाढत आहे ही अत्यंत आनंदाची बाब आहे. येत्या काळात आणि पुढील वर्षांत ही संख्या अधिक वाढेल, अशी मला आशा आहे,” असे पिंच चित्रपटाच्या दिग्दर्शिका उत्तरा सिंग यांनी सांगितले. या सर्व चित्रपटांच्या माध्यमातून ‘पिफ’मध्ये महिला दिग्दर्शकांचे प्रभावी स्थान यावर्षी प्रकर्षाने दिसत आहे.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!