पुणे – अर्बन नक्षलवादाच्या माध्यमातून हिंदूंची दिशाभूल करण्यात येत आहे. या देशविघातक शक्तींना चोख प्रत्युत्तर देण्यासाठी आता सर्व हिंदूंनी जात-पात, पक्ष विसरून एकजूट व्हायला हवे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे श्री. पराग गोखले यांनी केले. मुळशी तालुक्यातील उरवडे येथे ११ जानेवारी रोजी नवखंडेनाथ मंदिराच्या प्रांगणात आयोजित ‘हिंदुराष्ट्र जागृती सभेत’ ते बोलत होते. या सभेला २०० हून अधिक हिंदुत्वनिष्ठ, धर्मप्रेमी आणि जिज्ञासूंची उपस्थिती होती. उरवडे गावातील प्रखर हिंदुत्ववादी श्री.अंकुश गुंड, श्री नितीन रायरीकर यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मोलाचे सहकार्य केले. पुणे जिल्ह्यात उरवडेसह तळेगाव दाभाडे (मावळ) आणि पेठ (हवेली) अशा तीन ठिकाणी या सभांचे आयोजन करण्यात आले होते. या तिन्ही सभांना उपस्थितांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
मंदिर सरकारीकरण आणि ‘वक्फ’च्या विळख्यातून मुक्तता मिळेपर्यंत लढा सुरूच ! – श्री. दीपक आगवणे
पेठ (ता. हवेली) येथील सभेत बोलताना समितीचे श्री. दीपक आगवणे यांनी सांगितले की, मंदिर सरकारीकरण आणि वक्फ बोर्डाच्या कचाट्यातून भारतातील मंदिरे आणि त्यांच्या जमिनी मुक्त केल्याशिवाय हिंदु जनजागृती समिती स्वस्थ बसणार नाही. या सभेची सुरुवात ह.भ.प. तुषार आबा चौधरी यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली.
हिंदुराष्ट्र स्थापनेसाठी संघर्षरत राहणे आवश्यक – नागेश जोशी
तळेगाव दाभाडे येथील सभेत श्री. नागेश जोशी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले की, अयोध्येत श्रीराम मंदिर झाले आता हिंदुराष्ट्र स्थापनेसाठी संघर्षरत राहणे आवश्यक आहे. धर्मावरील आघातांना रोखण्यासाठी प्रत्येकाने धर्मशिक्षण घेणे गरजेचे आहे.
मान्यवरांची उपस्थिती आणि धर्मप्रेमींचा सहभाग !
पेठ येथील सभेत हिंदु राष्ट्र समन्वय समितीचे संयोजक श्री. सचिन घुले, महाराष्ट्र मंदिर महासंघाचे पुणे जिल्हा समन्वयक ह.भ.प. चोरघे महाराज, पोलीस पाटील श्री. दत्तात्रय चौधरी, ह.भ.प. रघुनाथ किसन चौधरी, चिंतामणी प्रासादिक दिंडीचे उपाध्यक्ष श्री. दत्तात्रय चौधरी, माजी सरपंच सौ. शोभाताई चौधरी आणि थेऊरचे ह.भ.प. ज्ञानोबा कुंजीर यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. या तिन्ही सभांचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे, याचे संपूर्ण नियोजन आणि सूत्रसंचालन स्थानिक धर्मप्रेमींनीच स्वयंस्फूर्तीने पार पाडले. समाजातील वाढता सहभाग हा हिंदुराष्ट्राच्या दिशेने पडणारे आश्वासक पाऊल आहे.











