अभिनेत्री तारा सुतारिया (Tara Sutaria)सध्या तिच्या लव्ह लाईफमुळे चर्चेत आहे. गेल्या वर्षभरापासून ती वीर पहाडीयाला (Veer Paharia) डेट करत आहे. तारा आणि वीर हे चाहत्यांच्या आवडत्या जोडप्यांपैकी एक आहेत. काही महिन्यांपूर्वीच आपलं नातं अधिकृत केल्यानंतर आता दोघांमध्ये ब्रेकअप झाल्याचं बोललं जात आहे. ए.पी ढिल्लोंच्या कॉन्सर्ट नंतरचा वाद आणि नंतर दोघांनाही मिळालेल्या चाहत्यांच्या पाठिंब्यानंतर तारा सुतारिया आणि वीर पहाडिया या दोघांनी त्यांचे नाते संपवण्याचा निर्णय घेतलाच बोललं जातंय. मात्र दोघेही ब्रेकपवर मौन बाळगून आहेत. दोघांच्या ब्रेकअपच्या चर्चांमुळे चाहतेही शॉक झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, 2025 च्या सुरुवातीला तारा आणि वीर एकमेकांना डेट करू लागले होते. खासगी आउटिंगदरम्यान दोघांना एकत्र पाहिल्यानंतर त्यांच्या रिलेशनशिपच्या चर्चांना वेग आला. काही काळातच दोघांनी आपलं नातं ऑफिशियल केलं होतं आणि सोशल मीडियावरही हे कपल चांगलंच चर्चेत होतं.
एपी ढिल्लोंच्या कॉन्सर्टमुळे वाद?
काही आठवड्यांपूर्वी तारा आणि वीर मुंबईत झालेल्या एपी ढिल्लोंच्या कॉन्सर्टमध्ये एकत्र दिसले होते. याच कॉन्सर्टदरम्यान एपी ढिल्लोंने ताराला गालावर किस केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. विशेष म्हणजे, त्या वेळी वीरही तिथे उपस्थित होता आणि त्याची प्रतिक्रिया नेटकऱ्यांच्या लक्षात राहिली होती. यानंतर दोघांमध्ये दुरावा निर्माण झाल्याची चर्चा सुरू झाली.
व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर ताऱ्याने सोशल मीडियावर स्पष्टीकरण देत, “खोट्या अफवा, चुकीचं एडिटिंग आणि पैशासाठी केलेली पीआर आम्हाला हादरवू शकत नाही. शेवटी प्रेम आणि सत्याचाच विजय होतो,” असं म्हटलं होतं. तर वीरनेही आपली प्रतिक्रिया देत, व्हायरल झालेला रिअॅक्शन एपी ढिल्लोंच्या ‘थोडी सी दारू’ या गाण्यावर नसून दुसऱ्या गाण्यावर होता, असं स्पष्ट केलं होतं.
तारा सुतारिया- वीर पहाडीयाचं अखेर ब्रेकअप?
मात्र फिल्मफेअरने दिलेल्या माहितीनुसार, तारा आणि वीर यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे. ब्रेकअपमागचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. दोघांपैकी कुणीही या कथित ब्रेकअपवर अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. विशेष म्हणजे ही बातमी एपी ढिल्लोंच्या कॉन्सर्ट नंतर काही आठवड्यानंतर आली आहे.
खरंतर याआधी दिलेल्या मुलाखतींमध्ये दोघांनी आपल्या ‘डीप कनेक्शन’बद्दल मोकळेपणाने बोललं होतं. वीरने पहिल्या डेटचा किस्सा सांगताना, आपण पियानो वाजवला आणि तारानं सूर्योदयापर्यंत गाणी गायली, असंही म्हटलं होतं.
तारा झळकणार कियारा अन् हुमा कुरेशीसोबत
दरम्यान, तारा सुतारिया लवकरच ‘टॉक्सिक’ या चित्रपटात यश, कियारा आडवाणी आणि हुमा कुरेशी यांच्यासोबत झळकणार आहे. या चित्रपटातील तिचा पहिला पोस्टर नुकताच समोर आला असून चाहत्यांकडून त्याला चांगला प्रतिसाद मिळतो आहे. आता तारा-वीरच्या ब्रेकअपच्या चर्चांमध्ये किती तथ्य आहे, हे दोघांपैकी कुणी अधिकृतपणे बोलल्यानंतरच स्पष्ट होईल.











