साधारण 20 वर्षांपूर्वी म्हणजेच 2005 मध्ये वार्षिक 3 लाख रुपये पगार घेणाऱ्या व्यक्तीने 20 वर्षांमध्ये 9 कोटी रुपयांची संपत्ती जमवली आहे. सध्या वर्षाला 65 लाख रुपये घेणाऱ्या व्यक्तीचे आपला पोर्टफोलिओ शेअर केला असून एवढे पैसे त्याने कसे जमवले हे सविस्तरपणे सांगितलं आहे. सध्या त्याची पोस्ट चर्चेचा विषय ठरतेय. नेमके एवढे पैसे या व्यक्तीने जमवले कसे ते समजून घेऊयात…
माझा 20 वर्षांचा वैयक्तिक आर्थिक प्रवासाचा अनुभव मी शेअर करतोय. मी 47 वर्षीय पुरुष असून मी आयटी क्षेत्रात काम करतान सामान्य पगारावर हे सारं मिळवलं आहे, असं पोस्टच्या सुरुवातीला या व्यक्तीने म्हटलंय. सध्याची लिक्विड नेट संपत्ती 9 कोटी रुपये असल्याचं या व्यक्तीने सांगितलं आहे. यापैकी 8 कोटी रुपये हे भारतीय शेअर्स तसेच इक्विटीमध्ये आहेत. तर एक कोटी भारतीय म्युच्युअल फंडमध्ये असल्याचं सांगतानाच स्वतःच्या मालकीचा एक फ्लॅट असल्याचाही उल्लेख पोस्टमध्ये या व्यक्तीने केलाय. सुरुवातीच्या काळात स्वतःच्या पैशांनी घेतलेला हा फ्लॅट असल्याचंही नमूद करायला तो विसरलेला नाही.
कसा वाढत गेला पैसा?
मी आयटी उद्योगात काम करणारा एक सामान्य माणूस आहे. मी खूप लवकर इक्विटीमध्ये गुंतवणूक करायला सुरुवात केली, असं सांगत नेमकी कशी आणि किती गुंतवणूक केली हे या व्यक्तीने सविस्तरपणे सांगितलं आहे. कोणत्या वर्षी किती पैसे गुंतवले आणि ते कसे वाढत गेले याचा त्याने मांडलेली हिशोब पाहूयात…
2016 – पगार ~25 लाख, पोर्टफोलिओ ~1 कोटी
2020 – पगार ~35 लाख, पोर्टफोलिओ ~2 कोटी
2025/जानेवारी – पगार ~65 लाख, पोर्टफोलिओ ~9 कोटी
ही 21% एक्सआयआरआर (XIRR) सह शुद्ध चक्रवाढ वाढ आहे. खरी जादू 10 ते 15 वर्षांनंतर होते. मी अजूनही अनेक शेअर्स दशकांपासून ठेवले आहेत, असंही या व्यक्तीने स्पष्ट केलं आहे.
या गुंतवणुकीमधील काही खास गोष्टी
इतक्यावरच न थांबता त्याने या गुंतवणुकीचे इतरही काही पैलू आवर्जून नमूद केलेत. ते पैलू कोणते हे खाली पाहूयात…
– कंपनीच्या/स्वतःच्या खर्चाने अनेक देशांमध्ये प्रवास केला असला तरी, परदेशातील नोकरी/डॉलरमधील कमाई नाही.
– माझा बचत दर नेहमीच सातत्यपूर्ण आणि उच्च होता, जी रक्कम दरवर्षी इक्विटीमध्ये गुंतवली जात असे.
– कोणतेही ईएसओपी (ESOP) नाही. पगार कर-पूर्व आहे. दरवर्षी नेहमीप्रमाणे काही अतिरिक्त बोनस/पुरस्कार मिळत असत.
– 5 जणांच्या कुटुंबात एकटा कमावणारा. साधे जीवन.
– कोणताही वारसा मिळालेला नाही.
– स्वतःच्या फ्लॅटमध्ये राहण्याव्यतिरिक्त कोणतीही अतिरिक्त स्थावर मालमत्ता नाही. कधीही मुदत ठेव (FD) केली नाही.
– ईपीएफचा यात समावेश नाही.
– 8 कोटींच्या इक्विटी होल्डिंगवर, मला दरवर्षी सुमारे 6 लाख रुपये लाभांश मिळतो.
– एफ अॅण्ड ओ किंवा इंट्राडे किंवा ट्रेडिंग नाही.
– पत्नीच्या पोर्टफोलिओचा यात समावेश नाही.
90 % गुंतवणूक थेट शेअर्समध्ये असून…
पोस्टच्या शेवटी या व्यक्तीने दोन गोष्टींबद्दल स्पष्टीकरण दिलं आहे. पोस्टवरील कमेंट्स पाहून पहिलं स्पष्टीकरण देताना, “माझी 90 % गुंतवणूक थेट शेअर्समध्ये आहे आणि 2020 नंतरच्या कोविड काळातील तेजीने यासाठी मदत केली. 2020 मध्ये, माझा पोर्टफोलिओ आधीच 2 कोटींचा होता आणि गेल्या 5 वर्षांतील अतिरिक्त गुंतवणूक सुमारे 1.2 कोटी आहे. मी याबद्दल अजून काही तपशील देऊ शकतो.
2020 पर्यंत – पोर्टफोलिओ 2 कोटी (15 वर्षांत गुंतवलेले भांडवल – 1.2 कोटी)
2020 – 2025 – तेजीच्या लाटेने गती दिली. पाच वर्षांत गुंतवलेले नवीन भांडवल 1.2 कोटी आहे. या नवीन भांडवलाने फारसा परतावा दिलेला नाही. पण जी बीजे पेरली आहेत, त्यांची फळे कदाचित एका दशकानंतर मिळतील. चक्रवाढीचा परिणाम खूप उशिरा दिसतो. 2020 पूर्वी मी खरेदी केलेल्या अनेक शेअर्सनी अनेक वर्षांनंतर परतावा दिला. सर्व लाभांश पुन्हा गुंतवले जातात.











