पुणे, दि. २२ ऑगस्ट : पुणे रेल्वे स्थानकावर रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांना उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या ‘रेलनीर’ पाण्याचा गेल्या महिन्यापासून तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे प्रवाशांना स्वस्त दरातील पाण्याऐवजी खासगी कंपन्यांच्या बाटल्या खरेदी कराव्या लागत आहेत.
‘रेलनीर’च्या एका बाटलीची किंमत १४ रुपये आहे. मात्र, रेलनीर उपलब्ध नसल्याने प्रवाशांना २० रुपयांची पाण्याची बाटली घ्यावी लागत आहे. त्यामुळे प्रत्येक बाटलीमागे सहा रुपये अतिरिक्त मोजावे लागत आहेत.
पुणे रेल्वे स्थानकावरून दररोज दीड लाखांहून अधिक प्रवासी प्रवास करतात. यातील निम्म्याहून अधिक प्रवासी स्थानकावरून पाण्याची बाटली खरेदी करतात. त्यामुळे या अतिरिक्त सहा रुपयांच्या खर्चामुळे प्रवाशांवर दररोज सरासरी चार लाख रुपयांचा आर्थिक भार पडत असल्याचे चित्र आहे.
रेलनीरचा तुटवडा पुण्याबरोबरच अहिल्यानगर, कोपरगाव, दौंड आणि शिर्डी या स्थानकांवरही जाणवत आहे. गेल्या महिन्यापासून रेलनीरचा आवश्यक पुरवठा नियमितपणे होत नसल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे.
तुटवडा दूर करण्यासाठी इतर खासगी कंपन्यांना पाणी विक्रीसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. मात्र, खासगी पाण्याच्या बाटल्यांचे दर अधिक असल्याने त्याचा थेट फटका प्रवाशांच्या खिशाला बसत आहे.
रेल्वे प्रशासनाच्या माहितीनुसार, ३१ ऑगस्टपर्यंत रेलनीरचा तुटवडा कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय आणि आर्थिक नुकसान आणखी वाढण्याची शक्यता आहे.
पाण्यासारख्या मूलभूत सुविधेचा तुटवडा निर्माण झाल्याने प्रवाशांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. रेलनीरचा पुरवठा नेमका कुठे अडला, याची माहिती प्रशासनाने स्पष्ट करावी, अशी मागणी होत आहे.
रेल्वे स्थानकावर दररोज मोठ्या संख्येने प्रवाशांची ये-जा होत असल्याने पिण्याच्या पाण्याची पुरेशी उपलब्धता करणे गरजेचे आहे. रेल्वे प्रशासनाने तातडीने उपाययोजना करून रेलनीरचा पुरवठा पूर्ववत करावा, अशी मागणी प्रवासी संघटनांकडून करण्यात येत आहे.











