September 5, 2026 10:12 am

मोशी दुर्घटनेतील मृत कामगाराच्या पत्नीचा मृत्यू; दोन चिमुकल्या मुलींवर महिनाभरात आई-वडिलांचे छत्र हरपले

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

 

नागेश गायकवाड यांच्या मृत्यूनंतर महिन्याभरात पत्नी सोनाली यांचा मृत्यू; कौटुंबिक व आर्थिक वादाची चर्चा

मोशी, दि. १३ ऑगस्ट : मोशी येथील वेस्ट टू एनर्जी प्रकल्पातील दुर्घटनेत पतीचा मृत्यू झाल्यानंतर अवघ्या महिन्याभरात त्यांच्या पत्नीचाही मृत्यू झाल्याने गायकवाड कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सोनाली नागेश गायकवाड (वय २३) यांचा मृत्यू झाला असून, त्यांच्या मृत्यूमुळे चार वर्षांची श्रेया आणि दीड वर्षांची प्रिया या दोन चिमुकल्या मुलींवर आई-वडिलांचे छत्र हरपले आहे.

मोशी कचरा डेपो परिसरातील वेस्ट टू एनर्जी प्रकल्पात काही काळापूर्वी झालेल्या दुर्घटनेत नागेश गायकवाड यांच्यासह एकूण नऊ कामगारांचा मृत्यू झाला होता. या दुर्घटनेनंतर गायकवाड कुटुंबावर मोठे संकट आले होते. नागेश यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबाला शासनाकडून आर्थिक मदत मिळाल्याची माहिती आहे.

दरम्यान, या आर्थिक मदतीच्या रकमेवरून कुटुंबात काही दिवसांपासून वाद सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. नागेश यांच्या मृत्यूनंतर मिळालेल्या मदतीच्या रकमेवरून कुटुंबातील सदस्यांमध्ये मतभेद निर्माण झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. या आर्थिक आणि कौटुंबिक वादाचा सोनाली यांच्या मानसिक स्थितीवर परिणाम झाला असावा, अशी चर्चा परिसरात आहे. मात्र, या प्रकरणातील नेमके कारण आणि घटनाक्रम तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.

सोनाली यांच्या मृत्यूची माहिती मिळताच परिसरात खळबळ उडाली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून आवश्यक ती कायदेशीर प्रक्रिया सुरू केली असून, या प्रकरणाचा तपास करण्यात येत आहे. आर्थिक मदतीच्या रकमेसंदर्भातील आरोप तसेच कौटुंबिक वादाच्या पार्श्वभूमीवर संबंधित व्यक्तींची चौकशी होण्याची शक्यता आहे.

नागेश गायकवाड यांच्या मृत्यूने आधीच कुटुंबावर मोठे संकट आले होते. त्यानंतर आता सोनाली यांच्या मृत्यूमुळे कुटुंबातील दोन लहान मुलींच्या संगोपनाचा प्रश्न गंभीर बनला आहे. आई-वडिलांचे प्रेम आणि आधार गमावलेल्या या दोन्ही मुलींच्या भवितव्याची जबाबदारी आता कुटुंबीयांवर आली आहे.

नागेश यांचे वडील टाटा मोटर्समध्ये स्वच्छता कर्मचारी म्हणून काम करतात, तर त्यांचा मोठा भाऊही टाटा मोटर्समध्ये कार्यरत असल्याची माहिती आहे. नागेश यांच्या पत्नी सोनाली या गृहिणी होत्या. गायकवाड कुटुंब मोशीतील बोराडे वस्ती परिसरात वास्तव्यास आहे.

मोशी वेस्ट टू एनर्जी प्रकल्पातील दुर्घटनेत नऊ कामगारांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांना शासनाकडून मिळणारी मदत, तिचे वितरण आणि त्यानंतर निर्माण होणारे कौटुंबिक प्रश्न याकडे प्रशासनाने संवेदनशीलतेने पाहण्याची गरज आहे. विशेषतः मृत कामगारांच्या कुटुंबातील लहान मुले आणि अवलंबित सदस्यांच्या सुरक्षित भवित्यासाठी शासनाने आवश्यक ती मदत आणि समुपदेशनाची व्यवस्था करावी, अशी मागणी होण्याची शक्यता आहे.

गायकवाड कुटुंबावर सलग दोन मोठ्या दुःखद घटना घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या प्रकरणातील आर्थिक वाद, कुटुंबीयांमधील मतभेद आणि सोनाली यांच्या मृत्यूमागील नेमकी परिस्थिती तपासातून समोर येणार आहे.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!