September 6, 2026 1:44 pm

जिल्हा बँकेच्या ९ जागांसाठी रंगणार चुरशीचा सामना

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

सहकार पॅनेलविरोधात ‘अजितदादा पवार शेतकरी परिवर्तन पॅनल’; १२ जागा बिनविरोध

बुलडाणा, प्रतिनिधी : बुलडाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेच्या निवडणुकीला आता चांगलाच रंग चढला असून, २१ पैकी १२ जागांची निवडणूक बिनविरोध झाल्यानंतर उर्वरित ९ जागांसाठी २३ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. सर्वपक्षीय नेत्यांच्या नेतृत्वाखालील ‘सहकार’ पॅनेलविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे आमदार मनोज कायंदे यांनी ‘अजितदादा पवार शेतकरी परिवर्तन पॅनल’ मैदानात उतरविल्याने जिल्हा बँकेची निवडणूक चुरशीची होण्याची चिन्हे आहेत.

उर्वरित नऊ जागांसाठी रविवार, ता. २३ रोजी मतदान होणार आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे जिल्ह्यातील सहकार क्षेत्रासह राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे आणि केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या नेतृत्वाखालील ‘सहकार’ पॅनेलविरोधात आमदार मनोज कायंदे यांनी स्वतंत्र पॅनेलची घोषणा केली आहे. पत्रकार परिषदेत पॅनेलची भूमिका स्पष्ट करताना कायंदे यांनी जिल्हा बँकेच्या अडचणीच्या काळात तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बँकेला ३०० कोटी रुपयांचे सुलभ कर्ज उपलब्ध करून दिल्याचा उल्लेख केला.

या आर्थिक मदतीमुळे बँकेला पुन्हा उभारी मिळाली असून, सध्या बँक सुमारे २४ कोटी रुपयांच्या नफ्यात आल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, अजित पवार यांच्या विचारांच्या कार्यकर्त्यांना बँकेच्या कारभारात अपेक्षित प्रतिनिधित्व मिळाले नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. याच पार्श्वभूमीवर ‘अजितदादा पवार शेतकरी परिवर्तन पॅनल’ निवडणुकीच्या मैदानात उतरविण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

नऊ जागांसाठी २३ उमेदवार

जिल्हा बँकेच्या उर्वरित नऊ जागांसाठी एकूण २३ उमेदवार निवडणूक लढवत आहेत. महिला राखीव दोन जागांसाठी पाच उमेदवार, ओबीसी प्रवर्गातील एका जागेसाठी चार उमेदवार, अनुसूचित जातीच्या एका जागेसाठी दोन उमेदवार, तर इतर संस्था मतदारसंघातील एका जागेसाठी दोन उमेदवार रिंगणात आहेत.

वैयक्तिक मतदारसंघातील लढतीकडे विशेष लक्ष लागले असून, विद्यमान आमदार चैनसूख संचेती यांच्याविरोधात ज्ञानेश्वरदादा ऊर्फ नाना पाटील मैदानात आहेत. या लढतीकडे प्रतिष्ठेची लढत म्हणून पाहिले जात आहे.

याशिवाय लोणार ग्रामसेवा मतदारसंघात दोन, संग्रामपूरमध्ये तीन, तर मलकापूर ग्रामसेवा मतदारसंघात तीन उमेदवार आमनेसामने आहेत. या मतदारसंघांमध्ये काही बंडखोर तसेच अजित पवार गटाशी संबंधित उमेदवार असल्याने निवडणुकीतील राजकीय समीकरणे अधिकच महत्त्वाची ठरणार आहेत.

१२ जागांवर निवड बिनविरोध

जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील २१ पैकी १२ जागांवर उमेदवारांची बिनविरोध निवड झाली आहे. मेहकर ग्रामसेवा मतदारसंघातून केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव, पणन मतदारसंघातून कामगार मंत्री आकाश फुंडकर, सिंदखेडराजा ग्रामसेवा मतदारसंघातून डॉ. राजेंद्र शिंगणे आणि मोताळा ग्रामसेवा मतदारसंघातून आमदार संजय गायकवाड यांची बिनविरोध निवड झाली आहे.

तसेच बुलडाणा येथून मयूर बाहेकार, चिखलीतून अंकुशराव पाटील, शेगावमधून पांडुरंगदादा पाटील, देऊळगावराजा येथून कावेरी सोनसळे, जळगाव जामोद येथून प्रसेनजीत पाटील, खामगाव येथून दिनेश काळणे, नांदुरा येथून राजेश देशमुख आणि व्हीजेएनटी मतदारसंघातून जालिंदर बुधवंत यांचीही बिनविरोध निवड झाली आहे.

राजकीय समीकरणांना महत्त्व

बिनविरोध निवडीनंतर आता उर्वरित नऊ जागांवर होणारी निवडणूक जिल्हा बँकेतील पुढील राजकीय आणि सहकार क्षेत्रातील समीकरणांसाठी महत्त्वाची मानली जात आहे. एका बाजूला अनुभवी नेत्यांच्या नेतृत्वाखालील ‘सहकार’ पॅनेल असून, दुसऱ्या बाजूला आमदार मनोज कायंदे यांच्या नेतृत्वाखालील ‘अजितदादा पवार शेतकरी परिवर्तन पॅनल’ असल्याने मतदार कोणाच्या बाजूने कौल देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

विशेषतः ग्रामसेवा, राखीव आणि वैयक्तिक मतदारसंघातील लढतींमध्ये उमेदवारांची वैयक्तिक ताकद, स्थानिक पातळीवरील संबंध आणि मतदारसंघातील राजकीय समीकरणे निर्णायक ठरण्याची शक्यता आहे.

आता २३ उमेदवारांपैकी कोणाला मतदारांचा कौल मिळतो आणि जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेच्या उर्वरित नऊ जागांवर कोण बाजी मारतो, याचा फैसला रविवार, ता. २३ रोजी होणाऱ्या मतदानानंतर होणार आहे.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!