पुणे, दि. ६ (प्रतिनिधी) : ठाणे शहरातील तब्बल ९३ लाख रुपयांच्या ऑनलाइन आर्थिक फसवणूक प्रकरणातील दोन फरार आरोपींना पुणे वाहतूक पोलिसांनी अत्यंत शिताफीने जेरबंद केले. ठाणे पोलिसांनी उपलब्ध करून दिलेल्या तांत्रिक माहितीच्या आधारे पुण्यातील अप्पा बळवंत चौक परिसरात सापळा रचून ही कारवाई करण्यात आली. त्यानंतर आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून दोन्ही आरोपींना पुढील तपासासाठी ठाण्यातील कोपरी पोलीस ठाण्याच्या पथकाच्या स्वाधीन करण्यात आले.
अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे अक्षय संजय तांबे (वय २२) आणि ओंकार विष्णू शिरसाठ (वय २४, दोघेही रा. ठाणे) अशी आहेत. या दोघांविरुद्ध ठाणे शहरातील कोपरी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता तसेच माहिती-तंत्रज्ञान कायद्यांतर्गत ऑनलाइन आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. त्यांनी एका व्यक्तीला विविध आमिषे दाखवत तब्बल ९३ लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप असून, गुन्हा दाखल झाल्यानंतर ते फरार झाले होते.
या गंभीर प्रकरणाचा तपास सुरू असताना कोपरी पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण आणि इलेक्ट्रॉनिक पुराव्यांच्या आधारे आरोपींचे लोकेशन पुण्यातील अप्पा बळवंत चौक परिसरात असल्याची खात्रीशीर माहिती मिळवली. ही माहिती तात्काळ पुणे शहर वाहतूक पोलिसांच्या विश्रामबाग वाहतूक शाखेला देण्यात आली.
माहिती मिळताच विश्रामबाग वाहतूक शाखेच्या पथकाने परिसरात काटेकोर नियोजन करून सापळा रचला. संशयित आरोपी दुचाकीवरून येत असताना पोलिसांनी त्यांना अडवून ताब्यात घेतले. प्राथमिक चौकशीदरम्यान दोघांची ओळख निश्चित करण्यात आली असता ते ठाण्यातील ९३ लाखांच्या ऑनलाइन फसवणूक प्रकरणातील फरार आरोपी असल्याचे स्पष्ट झाले.
त्यानंतर आरोपींविरोधातील कागदपत्रांची पडताळणी, अटकेची आवश्यक नोंद आणि इतर सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. त्यानंतर पुढील तपासासाठी दोन्ही आरोपींना ठाणे शहर पोलिसांच्या कोपरी पोलीस ठाण्याच्या पथकाच्या ताब्यात देण्यात आले.
ही यशस्वी कारवाई पोलिस उपायुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. कारवाईत विश्रामबाग वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक म्हात्रे, पोलिस हवालदार खरात व गौड, तसेच पोलिस अंमलदार शेख, कानवडे आणि प्रधान यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
या कारवाईमुळे ९३ लाखांच्या ऑनलाइन आर्थिक फसवणूक प्रकरणाच्या तपासाला महत्त्वाची गती मिळाली असून, आरोपींकडून फसवणुकीचे जाळे, आर्थिक व्यवहार, इतर संभाव्य साथीदार आणि अशाच प्रकारच्या गुन्ह्यांबाबत महत्त्वाची माहिती मिळण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
तसेच, विविध जिल्ह्यांतील पोलिसांमध्ये प्रभावी समन्वय, तांत्रिक तपासाचा अचूक वापर आणि वेळेवर केलेल्या नियोजनामुळे फरार आरोपींना जेरबंद करण्यात यश आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. ऑनलाइन आर्थिक फसवणुकीच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई महत्त्वपूर्ण मानली जात असून, अशा गुन्ह्यांवर आळा घालण्यासाठी राज्यातील विविध पोलीस यंत्रणा परस्पर समन्वयाने कार्यरत असल्याचे या कारवाईतून पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.











