राज्यातील दहावी आणि बारावी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून दहावीनंतर अनेकांनी नीट (NEET) परीक्षेची तयारी सुरू केली आहे. तर, बारावीच्या परीक्षेनंतरही अनेक विद्यार्थ्यांनी NEET परीक्षा देऊन भविष्यात डॉक्टर होण्याचे स्वप्न पाहिले होते.
मात्र, केंद्र सरकारने नीट परीक्षेसंदर्भात मोठा निर्णय घेतला असून यंदाच्या वर्षी म्हणजेच ३ मे २०२६ रोजी घेण्यात आलेली नीट परीक्षा रद्द करण्यात आली. नेमका पेपर कसा फुटला? याची सविस्तर माहिती आता समोर आली आहे.
प्राथमिक तपासात समोर आलेल्या माहितीनुसार NEET 2026 चा पेपर राजस्थानला कसा पोहचला ते समोर आलं आहे. यश यादवकडून हा पेपर राजस्थानला पोहचला. यश यादव विकास बिवलला ओळखतो. विकास बिवलचे वडील दीनेश बिवल यांनी हा पेपर स्कॅन केला आणि त्याची पीडीएफ फाईल तयार केली. आरोपीने हे प्रश्न हाताने लिहिले आणि त्यानंतर ते पान स्कॅन केलं. सिकर या ठिकाणी NEET ची परीक्षा देणाऱ्यांना हे पेपर त्याने विकले अशीही माहिती समोर आली आहे. यश यादव हा आयुर्वेदिक मेडिकल सायन्सचा विद्यार्थी आहे. त्याला विद्यार्थ्यांनी या पेपरच्या बदल्यात २ ते ५ लाख रुपये दिले. दरम्यान शुभम खैरनारने आपण मुख्य आरोपी नाही असं म्हटलं आहे. या प्रकरणात पैशांचा व्यवहार कसा झाला आणि पेपर कसा लिक झाला याची चौकशी सीबीआयकडून सुरु आहे.
पेपरीफुटीमुळे नीटची परीक्षा रद्द करण्यात आली असून सीबीआयमार्फत याप्रकरणाची चौकशी करण्यात येत आहे. देशभरात गेल्याच आठवड्यात म्हणजेच ३ मे २०२६ रोजी नीटची परीक्षा घेण्यात आली होती. आता, नव्या परीक्षेची तारीख लवकरच जाहीर होईल, त्यासाठी परीक्षार्थींचे परीक्षा केंद्र ३ मे रोजीचेच राहणार असून विद्यार्थ्यांना नव्याने रजिस्ट्रेशन करण्याची गरज नाही. विद्यार्थ्यांकडून नव्या परीक्षेसाठी शुल्क घेतले जाणार नाही, मात्र नव्या परीक्षेसाठी नवे ओळखपत्र दिले जाणार आहे. विद्यार्थी,पालकांनी फक्त एनटीएच्या सूचनांवर लक्ष ठेवावे, असे आवाहन केंद्राकडून करण्यात आले आहे.
वैद्यकीय शिक्षण पूर्ण न करता स्वतःला डॉक्टर म्हणवून घेणाऱ्या नाशिकमधील शुभम खैरनारला नीट पेपरफुटी प्रकरणात अटक झाली. मध्य नाशिकच्या एका व्यावसायिक संकुलात खैरनारने स्वतःचे कार्यालय थाटले होते. या भागातून दररोज वैद्यकीय शिक्षण घेणारे हजारो विद्यार्थी ये-जा करत असतात. कुणी पुस्तके घेण्यासाठी, शिकवणी घेण्यासाठी आणि नीटची तयारी करणाऱ्या अनेकांची इथे वर्दळ असते. याच भागात कार्यालय उघडून विद्यार्थ्यांचे समुपदेशन करणाऱ्या खैरनारने पेपरफुटी प्रकरणात लाखो रुपये कमवल्याचा आरोप होत आहे. २७ वर्षीय शुभम खैरनारने नीट परीक्षेची प्रश्नपत्रिका १० लाख रुपयांत विकत घेऊन ती १५ लाख रुपयांना विकल्याचा आरोप आहे. कुरिअरद्वारे नाशिकपासून ते राजस्थानपर्यंत प्रश्नपत्रिकेचे वितरण करण्यात आले. राजस्थानमधील सीबीआय पथकाने नाशिक पोलिसांना खैरनारच्या सहभागाची माहिती दिल्यानंतर त्याची अटक करण्यात आली.










