पुणे : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या पुण्यातील ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठ परिसरात काँग्रेसच्या एनएसयूआय आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप) कार्यकर्त्यांमध्ये वाद झाल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे कार्यक्रमाच्या पूर्वसंध्येला पुण्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
या प्रकरणाबाबत काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी विद्यार्थिनींना धमकावल्यानेच या वादाची ठिणगी पडल्याचा आरोप केला आहे. राहुल गांधी यांच्या कार्यक्रमाला विद्यार्थिनींकडून मिळणारा प्रतिसाद पाहून त्यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला.
काँग्रेसच्या आरोपानुसार, काही विद्यार्थिनींनी कार्यक्रमासंदर्भात तसेच शिक्षण शुल्क, आर्थिक अडचणी आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांबाबत माध्यमांशी संवाद साधला होता. त्यानंतर संबंधित विद्यार्थिनींवर माफीनामा देण्यासाठी दबाव टाकण्यात आला. विद्यार्थिनींनी त्याला विरोध केल्यानंतर त्यांना वसतिगृहात डांबून ठेवल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला.
दरम्यान, अभाविपने हे आरोप फेटाळत वेगळा दावा केला आहे. काँग्रेस आणि एनएसयूआयचे कार्यकर्ते वसतिगृह परिसरात दाखल होऊन विद्यार्थिनींना कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी धमकावत असल्याचा आरोप अभाविपकडून करण्यात आला. या घटनेत काही विद्यार्थ्यांना मारहाण झाल्याचाही दावा करण्यात आला आहे. त्यामुळे दोन्ही संघटनांकडून परस्परविरोधी आरोप केले जात आहेत.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनीही या घटनेवर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. विद्यार्थिनींना धमकावणे, त्यांच्या स्वातंत्र्यावर गदा आणणे किंवा विचारांचा सामना करण्याऐवजी दहशतीचा मार्ग स्वीकारणे चुकीचे असल्याचे त्यांनी म्हटले. या प्रकरणाची पोलिसांनी निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.
दरम्यान, राहुल गांधी यांचा ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रम २२ ऑगस्ट रोजी पुण्यात होणार असून, विद्यार्थिनींच्या शिक्षण, रोजगार, महिला सुरक्षा, शिक्षणाचा वाढता खर्च आणि विद्यार्थ्यांच्या अधिकारांसारख्या विषयांवर संवाद होणार आहे. कार्यक्रमासाठी पुणे पोलिसांनी सुरक्षेच्या दृष्टीने विविध अटींसह परवानगी दिली आहे.
या पार्श्वभूमीवर विद्यार्थिनींची सुरक्षितता, कार्यक्रमातील कायदा-सुव्यवस्था आणि संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी याकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी काँग्रेसकडून करण्यात आली आहे.











