एकाला खिडकीतून पळताना पकडले; दुसरा वडापावच्या दुकानामागे पोलिसांच्या जाळ्यात
पुणे : गोळीबार करून परिसरात दहशत निर्माण केल्याप्रकरणी निलेश घायवळ टोळीविरुद्ध दाखल असलेल्या ‘मोक्का’च्या गुन्ह्यात तब्बल वर्षभरापासून फरार असलेल्या दोन पाहिजे आरोपींना कोथरूड पोलिसांनी अखेर अटक केली. संतोष अनंत धुमाळ आणि विपुल उत्तम माझिरे (३०) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दोन्ही आरोपींचा शोध घेण्यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने सापळा रचला. विशेष म्हणजे, पोलिसांची चाहूल लागताच संतोष धुमाळने फ्लॅटच्या खिडकीतून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी त्याचा पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून मिळालेल्या महत्त्वाच्या माहितीच्या आधारे पोलिसांनी काही तासांतच दुसरा आरोपी विपुल माझिरे यालाही बालगंधर्व चौक परिसरातून अटक केली.
मोक्का गुन्ह्यात वर्षभरापासून फरार
कोथरूड पोलिस ठाण्याच्या हद्दीत गोळीबार करून दहशत निर्माण केल्याच्या प्रकरणात निलेश घायवळ टोळीविरुद्ध दोन स्वतंत्र ‘मोक्का’ कारवाया करण्यात आल्या होत्या. या गंभीर प्रकरणात संतोष धुमाळ आणि विपुल माझिरे हे दोघेही पोलिसांच्या रेकॉर्डवर पाहिजे आरोपी होते.
गुन्हा दाखल झाल्यानंतर दोघेही पोलिसांना गुंगारा देत होते. वर्षभरापासून त्यांचा शोध सुरू होता. आरोपी सातत्याने ठिकाणे बदलत असल्याने त्यांना पकडणे पोलिसांसमोर आव्हान होते.
पत्नीला भेटण्यासाठी आला अन् पोलिसांच्या जाळ्यात अडकला
फरार आरोपी संतोष धुमाळ याचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून विविध पातळ्यांवर माहिती गोळा केली जात होती. याचदरम्यान पोलीस हवालदार राजेंद्र लांडगे यांना धुमाळ पत्नीला भेटण्यासाठी कोथरूड गावठाणातील गुलमोहर सोसायटीत येणार असल्याची माहिती मिळाली.
ही माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आल्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाईचे नियोजन केले. सहायक पोलीस निरीक्षक सुधीर घुले आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचे पथक गुलमोहर सोसायटी परिसरात दाखल झाले.
पोलिसांनी सोसायटीत ये-जा करणाऱ्या मार्गांवर तसेच लिफ्टच्या परिसरात लक्ष ठेवले. एका फ्लॅटची तपासणी सुरू असताना संतोष धुमाळ पोलिसांच्या नजरेस पडला.
खिडकीतून पळण्याचा प्रयत्न फसला
पोलिसांची चाहूल लागताच धुमाळने तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्याने फ्लॅटच्या खिडकीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला; मात्र परिसरात आधीच दबा धरून बसलेल्या पोलिसांनी त्याला शिताफीने पकडले.
धुमाळला ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी केली. या चौकशीतून दुसरा पाहिजे आरोपी विपुल माझिरे याच्याबाबत पोलिसांना महत्त्वाची माहिती मिळाली.
वडापावच्या दुकानामागे दुसरा आरोपी जेरबंद
विपुल माझिरे हा संतोष धुमाळला भेटण्यासाठी बालगंधर्व चौकातील जोशी वडेवाले दुकानाच्या मागील बाजूस येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
माहिती मिळताच पोलिसांचे पथक तातडीने बालगंधर्व चौकात पोहोचले. दुकानाच्या मागील बाजूस पोलिसांनी सापळा रचला आणि योग्य संधीची वाट पाहत ते दबा धरून बसले.
काही वेळाने विपुल माझिरे तेथे संतोष धुमाळला भेटण्यासाठी आला. पोलिसांनी संधी साधत त्याला जागीच ताब्यात घेतले. अशा प्रकारे वर्षभरापासून फरार असलेल्या दोन्ही आरोपींना पोलिसांनी एकाच कारवाईच्या माध्यमातून जेरबंद केले.
विपुल माझिरे हा पोलिसांच्या रेकॉर्डवर शार्प शूटर म्हणून नोंद असलेला आरोपी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, पोलीस उपआयुक्त डॉ. सागर कवडे आणि सहायक पोलीस आयुक्त सुजाता तानवडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण घोडके, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अनिल माने, सुनील कारोटे आणि सहायक पोलीस निरीक्षक सुधीर घुले यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांचे पथक तयार करण्यात आले होते.
या पथकात पोलीस हवालदार राजेंद्र लांडगे, पठाण, सोनावणे, दगडे, लोखंडे तसेच पोलीस शिपाई पांढरे, शिर्के, डोंगरे आणि जमदाडे यांचा समावेश होता.
दोन्ही आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीसह संबंधित प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.











