September 7, 2026 2:54 pm

पाळीव प्राण्यांच्या नुकसानभरपाईसाठी शेतकऱ्यांची ससेहोलपट; जाचक अटी शिथिल करण्याची मागणी

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

बिबट्या, वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात पशुधन गमावणाऱ्या शेतकऱ्यांसमोर भरपाई मिळविण्याचे आव्हान

उत्रौली, ता. १२ : भोर तालुक्यातील वीसगाव खोऱ्यात बिबट्या तसेच अन्य वन्यप्राण्यांच्या हल्ल्यांमध्ये शेतकऱ्यांचे पाळीव प्राणी मृत्युमुखी पडण्याच्या घटना घडत आहेत. पशुधन हे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या उत्पन्नाचे महत्त्वाचे साधन असल्याने अशा घटनांमुळे त्यांचे मोठे आर्थिक नुकसान होते. वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मृत झालेल्या पाळीव प्राण्यांसाठी वनखात्यामार्फत नुकसानभरपाईची तरतूद असली, तरी भरपाई मिळविण्यासाठीची प्रक्रिया किचकट असल्याने शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

वीसगाव खोऱ्यातील डोंगररांगांमध्ये मोठ्या प्रमाणात संरक्षित जंगल असून, या परिसरात वनसंपदाही वाढली आहे. परिणामी वन्यप्राण्यांचा अधिवास वाढल्याचे स्थानिक शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. परिसरातील अनेक शेतकरी शेतीसोबत शेळ्या, मेंढ्या तसेच अन्य पशुधन पाळतात. डोंगर उतारावरील शेती आणि चराऊ क्षेत्रात पशुधन चारण्यासाठी नेताना बिबट्यासारख्या वन्यप्राण्यांचा धोका कायम असतो.

पशुधनाचा बळी, मात्र भरपाईसाठी कागदपत्रांची कसरत

बिबट्या किंवा अन्य वन्यप्राण्याने पाळीव प्राण्यावर हल्ला केल्यानंतर अनेकदा मृत प्राण्याला जंगलाच्या दाट भागात नेले जाते. त्यामुळे मृत जनावर किंवा त्याचे अवशेष शोधणे शेतकऱ्यांसाठी मोठे आव्हान ठरते. अनेकदा अवशेषच सापडत नसल्याने भरपाईच्या प्रक्रियेत अडथळे निर्माण होतात.

याशिवाय घटनेनंतर ठरावीक वेळेत ऑनलाइन अर्ज करणे, वन विभागाकडून तपासणी व पंचनामा करून घेणे, मृत जनावराचे शवविच्छेदन करून त्याचा अहवाल सादर करणे, आवश्यक कागदपत्रे जमा करणे तसेच घटनेचे आणि मृत प्राण्याचे छायाचित्र सादर करणे, अशा विविध प्रक्रियेतून शेतकऱ्यांना जावे लागते.

ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना ऑनलाइन अर्ज, तांत्रिक प्रक्रिया आणि विविध कागदपत्रांची पूर्तता करताना अडचणी येतात. त्यातच मृत जनावराचे अवशेष न सापडल्यास भरपाई मिळण्याची शक्यता कमी होते. परिणामी काही शेतकऱ्यांना हजारो रुपयांपासून लाखो रुपयांपर्यंत झालेल्या नुकसानीचा भार स्वतःच सहन करावा लागतो.

नुकसानभरपाईसाठी आवश्यक पुरावे

वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात पाळीव प्राणी मृत्युमुखी पडल्यास नुकसानभरपाईसाठी प्रामुख्याने पुढील कागदपत्रे व पुरावे आवश्यक असतात :

  • वनरक्षकाचा तपासणी व पंचनामा अहवाल
  • पशुवैद्यकीय अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र
  • अर्जदाराचे ओळखपत्र व बँक खात्याची कागदपत्रे
  • घटनेच्या ठिकाणाचे आणि मृत प्राण्याचे छायाचित्र
  • छायाचित्रांमध्ये अक्षांश, रेखांश, वेळ आणि ठिकाणाची माहिती आवश्यक

अटी शिथिल करण्याची शेतकऱ्यांची मागणी

वन्यप्राण्यांच्या हल्ल्यामुळे पशुधन गमावल्यानंतर शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानीसोबतच भरपाई मिळविण्यासाठी वेळ, पैसा आणि श्रम खर्च करावे लागतात. त्यामुळे नुकसानभरपाईची प्रक्रिया अधिक सोपी आणि शेतकरीस्नेही करण्याची मागणी परिसरातील शेतकऱ्यांकडून होत आहे.

विशेषतः मृत जनावराचे अवशेष उपलब्ध नसलेल्या घटनांसाठी पर्यायी पुराव्यांची व्यवस्था करावी, ऑनलाइन अर्जासाठी असलेली वेळेची अट शिथिल करावी आणि स्थानिक पातळीवर अर्ज व कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी मदत उपलब्ध करून द्यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

“मृत जनावर किंवा अवशेष हा महत्त्वाचा पुरावा”

वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मृत झालेल्या पाळीव जनावरांच्या मालकांना वन विभागामार्फत नुकसानभरपाई दिली जाते. मात्र नुकसानभरपाई मिळण्यासाठी मृत जनावर किंवा मृत जनावरांचे अवशेष हा महत्त्वाचा पुरावा आवश्यक असल्याचे भोरचे वनपरिक्षेत्र अधिकारी शिवाजी राऊत यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, वन्यप्राण्यांचा वाढता वावर आणि पशुधनावर होणारे हल्ले लक्षात घेता, शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी आणि नुकसानभरपाईची प्रक्रिया सुलभ व्हावी, अशी अपेक्षा वीसगाव खोऱ्यातील शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे. त्यांच्या उपजीविकेचा महत्त्वाचा आधार असलेल्या पशुधनाचे नुकसान झाल्यानंतर भरपाईसाठी होणारी ससेहोलपट थांबविण्यासाठी प्रशासनाने या प्रक्रियेचा पुनर्विचार करण्याची गरज आहे.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!