पुणे : पुणे शहरात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली असून शहरभर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. महापालिकेकडून खड्ड्यांची दुरुस्ती करण्यात येत असल्याचा दावा केला जात असला, तरी प्रत्यक्षात हे पॅचवर्क केवळ नावालाच असल्याचे चित्र आहे. अनेक ठिकाणी भरलेले खड्डे अवघ्या २४ तासांत पुन्हा उघडत असल्याने वाहनचालकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. परिणामी वाहतूक कोंडी, अपघातांचा वाढता धोका आणि नागरिकांचा वेळ व इंधनाचा अपव्यय या समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहेत.
सध्या शहरातील प्रमुख तसेच अंतर्गत रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. शहराच्या मध्यवर्ती भागातील मंगळवार पेठ, कसबा पेठ, रविवार पेठ, तसेच कोथरूड, परमहंस नगर, अण्णा भाऊ साठे चौक, एसएनडीटी परिसर, पौड रस्ता, कोथरूड डेपो, एकलव्य कॉलेज रोड, शांतीबन चौक, राजा शिवराय प्रतिष्ठान भुयारी मार्ग, मोरे विद्यालय परिसर, आंबेगाव, दत्तनगर चौक, जांभुळवाडी रस्ता, नऱ्हे मार्ग, शिवसृष्टी परिसर, सिंहगड कॉलेज परिसर, कात्रज, सातारा रस्ता, मांगडेवाडी, शेलार मळा, महादेव नगर, कोंढवा, कोंढवा खुर्द, येवलेवाडी, बावधन, बाणेर, बालेवाडी, औंध, चांदणी चौक ते वारजे-माळवाडी सेवा रस्ता, वारजे उड्डाणपूल ते रामनगर आणि दांगट इंडस्ट्रियल परिसर अशा अनेक भागांमध्ये मोठमोठे खड्डे पडले आहेत.
या खड्ड्यांमुळे वाहनांचा वेग मंदावला असून ऐन गर्दीच्या वेळेत वाहतूक कोंडीची समस्या अधिकच तीव्र होत आहे. कार्यालयीन वेळेत नोकरदार, विद्यार्थी आणि व्यावसायिकांना वेळेत गंतव्यस्थानी पोहोचणे कठीण झाले आहे. दुचाकीस्वारांना प्रत्येक खड्डा चुकवत वाहन चालवावे लागत असून, पावसाचे पाणी साचल्याने खड्ड्यांचा अंदाज येत नसल्यामुळे अपघातांची शक्यता वाढली आहे.
याचा सर्वाधिक फटका लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, गरोदर महिला आणि रुग्णांना बसत आहे. रुग्णवाहिका आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेलाही या खराब रस्त्यांमुळे विलंब होत असून नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
महापालिकेच्या आदेशांनंतरही परिस्थिती ‘जैसे थे’
महापालिका आयुक्तांनी यापूर्वी पाणीपुरवठा, ड्रेनेज, विद्युत वाहिन्या आणि इतर सेवा सुविधांसाठी खोदलेले रस्ते तातडीने पूर्ववत करण्याचे आदेश दिले होते. तसेच अत्यावश्यक कामांशिवाय रस्ते खोदण्यास परवानगी देऊ नये, अशाही सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र प्रत्यक्षात अनेक ठिकाणी पावसाळ्यातही खोदकाम सुरूच राहिले. खोदलेले रस्ते आणि पदपथ निकृष्ट दर्जाने भरल्याने काही दिवसांतच ते पुन्हा उखडले आणि खड्ड्यांचे प्रमाण वाढले.
महापालिकेकडून खड्डे बुजविण्याची मोहीम सुरू असल्याचे सांगितले जात असले, तरी नागरिकांचा अनुभव मात्र वेगळाच आहे. अनेक ठिकाणी डांबर टाकून तात्पुरती दुरुस्ती केली जाते; परंतु पहिल्याच जोरदार पावसानंतर ती वाहून जाते आणि खड्डे पूर्वीपेक्षा अधिक मोठे होतात. त्यामुळे प्रशासनाच्या दुरुस्तीच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
वाहतूक कोंडी आणि आर्थिक नुकसान
रस्त्यांच्या खराब अवस्थेमुळे वाहनांचा वेग कमी झाला असून शहरातील प्रमुख चौकांमध्ये दररोज वाहतुकीच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. यामुळे इंधनाचा अतिरिक्त खर्च, वायू प्रदूषण, वेळेचा अपव्यय आणि मानसिक ताण या समस्याही वाढत आहेत. व्यावसायिक, डिलिव्हरी सेवा, शालेय वाहतूक आणि सार्वजनिक परिवहन व्यवस्थेवरही याचा परिणाम होत आहे.
नागरिकांची मागणी
शहरातील नागरिकांनी महापालिकेकडे केवळ तात्पुरत्या पॅचवर्कऐवजी उच्च दर्जाची आणि दीर्घकालीन रस्तेदुरुस्ती करण्याची मागणी केली आहे. पावसाळ्यापूर्वी रस्त्यांचे सर्वेक्षण करून नियोजनबद्ध दुरुस्ती, निकृष्ट दर्जाच्या कामांवर कारवाई, खोदकाम करणाऱ्या यंत्रणांवर दंडात्मक कारवाई आणि कामांच्या गुणवत्तेची तृतीयपक्षीय तपासणी करण्याचीही मागणी होत आहे.
पुणेकरांचे म्हणणे आहे की, शहरातील रस्त्यांची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत असताना केवळ दावे आणि तात्पुरत्या उपाययोजनांनी प्रश्न सुटणार नाही. सुरक्षित, खड्डेमुक्त आणि वाहतुकीसाठी सक्षम रस्ते उपलब्ध करून देणे ही महापालिका प्रशासनाची प्राथमिक जबाबदारी असून त्यासाठी तातडीने ठोस आणि कायमस्वरूपी उपाययोजना राबविण्याची गरज आहे.











