पुणे | प्रतिनिधी
पुण्यातील हिंजवडी आयटी पार्क परिसरात बुधवारी सायंकाळी अचानक मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त, शस्त्रसज्ज एनएसजी (नॅशनल सिक्युरिटी गार्ड) कमांडो आणि सुरक्षा वाहनांचा ताफा दाखल झाल्याने काही काळ नागरिक आणि आयटी कर्मचाऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले. मात्र, कोणताही दहशतवादी धोका किंवा आपत्कालीन घटना घडलेली नसून, सुरक्षा यंत्रणांची तयारी आणि समन्वय तपासण्यासाठी आयोजित करण्यात आलेले विशेष ‘मॉक ड्रिल’ असल्याचे नंतर स्पष्ट झाले.
दुपारी ४ वाजता सुरू झालेला हा सुरक्षा सराव रात्री ९ वाजेपर्यंत जवळपास पाच तास सुरू होता. जागतिक दर्जाच्या आयटी पार्कमधील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेणे, संभाव्य दहशतवादी हल्ला किंवा आपत्कालीन परिस्थितीत विविध यंत्रणांची तत्परता तपासणे आणि त्वरित प्रतिसाद (Quick Response) प्रणालीची चाचणी घेणे हा या सरावाचा मुख्य उद्देश होता.
माण-हिंजवडी परिसरातील एका नामांकित आयटी कंपनीच्या आवारात कडक सुरक्षा व्यवस्थेत १०० हून अधिक एनएसजी कमांडो दाखल झाले. या सरावामध्ये आधुनिक शस्त्रास्त्रे, विशेष सुरक्षा उपकरणे आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून विविध आपत्कालीन परिस्थितींची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. यामध्ये इमारतीतील बचाव मोहीम, दहशतवादी हल्ल्याला प्रतिसाद आणि नागरिकांच्या सुरक्षित स्थलांतरासारख्या विविध परिस्थितींचा समावेश होता.
या विशेष सरावात भारतीय एनएसजी कमांडोंसोबत अमेरिकेचे १७ विशेष कमांडो देखील सहभागी झाले होते. दोन्ही देशांतील सुरक्षा दलांनी संयुक्तरीत्या विविध सुरक्षा तंत्रांचा सराव करत आंतरराष्ट्रीय स्तरावरील समन्वय आणि कार्यपद्धतीची चाचणी घेतली.
हिंजवडी आयटी पार्कमध्ये देश-विदेशातील अनेक नामांकित कंपन्यांची कार्यालये असून, दररोज हजारो कर्मचारी येथे कार्यरत असतात. त्यामुळे या परिसराची सुरक्षा अधिक सक्षम ठेवण्यासाठी अशा प्रकारचे नियमित सराव महत्त्वाचे मानले जातात. या मोहिमेत स्थानिक पोलिसांसह इतर सुरक्षा यंत्रणांनीही सक्रिय सहभाग नोंदवत एनएसजीला आवश्यक सहकार्य केले.
सायंकाळच्या वेळेत मोठ्या प्रमाणावर शस्त्रसज्ज कमांडो आणि सुरक्षा वाहनांचा ताफा परिसरात दाखल झाल्यामुळे सुरुवातीला अनेक कर्मचारी आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, हा केवळ पूर्वनियोजित सुरक्षा सराव असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
सुरक्षा यंत्रणांच्या म्हणण्यानुसार, देशातील महत्त्वाच्या औद्योगिक आणि आयटी केंद्रांमध्ये अशा प्रकारचे मॉक ड्रिल वेळोवेळी आयोजित केले जातात. यामुळे कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत विविध सुरक्षा दलांमधील समन्वय अधिक प्रभावी होतो आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी आवश्यक प्रतिसाद क्षमता अधिक सक्षम बनते.











