September 6, 2026 12:42 pm

ऑपरेशन मॉडिफिकेशन’ची धडक! कर्णकर्कश हॉर्न आणि मॉडिफाइड सायलेन्सरवर कारवाई; तीन दिवसांत २७४ दुचाकीस्वार दंडित

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

पुणे | प्रतिनिधी

पुणे शहरातील ध्वनीप्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी वाहतूक पोलिसांनी सुरू केलेल्या ‘ऑपरेशन मॉडिफिकेशन’ या विशेष मोहिमेला वेग आला आहे. कर्णकर्कश हॉर्नचा वापर करणारे तसेच दुचाकींमध्ये बेकायदा मॉडिफाइड सायलेन्सर बसवून मोठा आवाज करणाऱ्या वाहनचालकांविरोधात गेल्या तीन दिवसांत व्यापक कारवाई करण्यात आली. या मोहिमेदरम्यान २७४ दुचाकीस्वारांवर कारवाई करून ₹२ लाख ७४ हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

शहरात विशेषतः बुलेटसह इतर दुचाकींमध्ये मूळ सायलेन्सरमध्ये फेरफार करून मोठा आवाज करणारे मॉडिफाइड सायलेन्सर बसविण्याचे प्रकार वाढत असल्याचे वाहतूक पोलिसांच्या निदर्शनास आले होते. रात्रीच्या वेळी अशा दुचाकींच्या कर्णकर्कश आवाजामुळे नागरिक, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी आणि रुग्णांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याच्या तक्रारी सातत्याने पोलिसांकडे दाखल होत होत्या. याशिवाय अनेक वाहनचालकांकडून नियमबाह्य आणि कर्णकर्कश हॉर्नचा वापर होत असल्याने शहरातील ध्वनीप्रदूषणातही मोठी भर पडत असल्याचे दिसून आले.

या पार्श्वभूमीवर पुणे वाहतूक पोलिसांनी शहरातील विविध चौक, प्रमुख रस्ते आणि पोलिस ठाण्यांच्या हद्दीत ‘ऑपरेशन मॉडिफिकेशन’ ही विशेष मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेत केवळ नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांवरच नव्हे, तर बेकायदा सायलेन्सर बसविणाऱ्या गॅरेज चालकांवरही कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.

वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात येत आहे. कारवाईदरम्यान फटाक्यासारखा आवाज करणारे ८४ मॉडिफाइड सायलेन्सर दुचाकींवरून काढून जप्त करण्यात आले. अशा प्रकारचे सायलेन्सर वापरणाऱ्या वाहनचालकांविरोधात पुढील काळातही कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

वाहतूक पोलिसांनी नागरिकांना आणि वाहनचालकांना वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले आहे. दुचाकींमध्ये कोणत्याही प्रकारचे बेकायदा मॉडिफिकेशन करू नये, तसेच कर्णकर्कश हॉर्नचा वापर टाळावा, असे आवाहन पोलिस उपायुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे यांनी केले आहे.

शहरातील ध्वनीप्रदूषण कमी करणे, नागरिकांना शांत आणि सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देणे तसेच वाहतूक नियमांची प्रभावी अंमलबजावणी करणे हा या विशेष मोहिमेचा मुख्य उद्देश असल्याचे वाहतूक पोलिसांनी सांगितले आहे. आगामी काळातही अशा विशेष मोहिमा सातत्याने राबवून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई केली जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!