चंद्रपूर-गडचिरोली-वर्धा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषद निवडणुकीतून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्या कन्या शिवानी वडेट्टीवार यांनी वय एक महिना कमी भरत असल्याने माघार घेतली आहे.
स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी उमेदवाराचे वय किमान ३० वर्षे असणे कायद्याने बंधनकारक आहे. मात्र, शिवानी वडेट्टीवार यांचे वय या निकषात अवघ्या एक महिन्याने कमी पडत असल्याचे समोर आले. कोणतीही कायदेशीर किंवा तांत्रिक अडचण भविष्यात निर्माण होऊ नये, यासाठी त्यांनी या निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय घेतला. वयाची ही अट पूर्ण होत नसल्यानेच हा निर्णय घ्यावा लागल्याचे पक्षांतर्गत गोटातून सांगण्यात आले. या मतदारसंघात त्यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू असतानाच या तांत्रिक कारणामुळे त्यांच्या उमेदवारीला ब्रेक लागला आहे.
शिवानी वडेट्टीवार यांच्या माघारीनंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले होते. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी माध्यमांशी बोलताना पक्षाची भूमिका स्पष्ट केली. शिवानी यांनी घेतलेली माघार म्हणजे महाविकास आघाडीची माघार अजिबात नाही. ही केवळ एका उमेदवाराची तांत्रिक अडचण आहे. महाविकास आघाडी या निवडणुकीत पूर्ण ताकदीने उतरणार असून, अद्याप उमेदवारीबाबत अंतिम निर्णय झालेला नाही, असे वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बोलताना विजय वडेट्टीवार यांनी सत्ताधारी भाजपवर जोरदार निशाणा साधला. या निवडणुकीत एकीकडे प्रचंड धनशक्तीचा वापर केला जात आहे. पैशाच्या जोरावर निवडणूक जिंकण्याचा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न सुरू आहे, असा आरोप त्यांनी केला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत होणाऱ्या आर्थिक गणितांवर बोट ठेवत त्यांनी आगामी लढत सोपी नसली, तरी काँग्रेस आणि महाविकास आघाडी भाजपला तगडे आव्हान देणार असल्याचे संकेत दिले.
चंद्रपूर, गडचिरोली आणि वर्धा या तीन जिल्ह्यांत विस्तारलेल्या या मतदारसंघासाठी महाविकास आघाडी अत्यंत सावध पावले टाकत आहे. भाजप या जागेसाठी कोणाला उमेदवारी देतो, त्यांचा चेहरा कोण आहे, हे पाहूनच महाविकास आघाडी आपला अंतिम उमेदवार रिंगणात उतरवेल, असे विजय वडेट्टीवार यांनी सांगितले. विरोधकांच्या रणनीतीवर मात करू शकेल अशा सक्षम उमेदवाराचा शोध सध्या सुरू असून, लवकरच महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवाराची घोषणा केली जाईल, अशी माहिती त्यांनी दिली.











