जमिनीच्या तुकड्यासाठी हल्ली नाती सुद्धा कवडीमोल असल्याचे प्रकार वारंवार घडत आहे. अशातच नाशिक जिल्ह्यातून एक धक्कादायक आणि मन सुन्न करणारी घटना घडली आहे. शेतीच्या वादातून अंगावर ट्रॅक्टर घालून महिलांना चिरडण्याचा प्रयत्न झाला आहे.
या घटनेत दोन महिला जखमी झाल्या आहेत. या एका महिलेची प्रकृती गंभीर असल्याचं सांगितलं जात आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसंत परिसरात जमीन वादातून ही धक्कादायक घटना घडली. पिंपळगाव बसंत येथील अजय गोसावी यांच्या भावकीमध्ये जमीन वाद सुरू असून संबंधित प्रकरण न्यायालयात प्रलंबित आहे. न्यायालयाने या वादग्रस्त जमिनीवर स्थगिती आदेश दिलेला असतानाही ऋषिकेश निखिल गोसावी, अभिषेक निनाद गोसावी आणि इतर पाच जणांनी भाड्याने ट्रॅक्टर आणून संबंधित जमीन नांगरण्यास सुरुवात केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
ही बाब लक्षात आल्यानंतर अजय गोसावी, रश्मी अजय गोसावी आणि सुवर्णा सुभाष गोसावी हे ट्रॅक्टर चालकाला विचारपूस करण्यासाठी गेले होते. त्यावळी ट्रॅक्टर चालक आणि गोसावी कुटुंबीयांमध्ये बाचाबाची झाली. यावेळी संतापलेल्या ट्रॅक्टर चालकाने त्यांच्या अंगावर ट्रॅक्टर घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. हा सगळा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या घटनेत रश्मी अजय गोसावी आणि सुवर्णा सुभाष गोसावी या जखमी झाल्या असून त्यांच्यावर पिंपळगाव येथील राधाकृष्ण हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
धक्कादायक म्हणजे, जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल केलं आहे. जखमींपैकी एका महिलेची प्रकृती गंभीर असल्याचं सांगितलं जात आहे. या प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहे. पण जखमींची प्रकृती गंभीर असतानाही पोलिसांनी आरोपींवर अत्यंत हलक्या स्वरूपाचे गुन्हे दाखल केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. न्यायालयाचा स्थगिती आदेश असतानाही संबंधितांकडून जमिनीवर जबरदस्तीने प्रवेश करण्यात आला, असा आरोपही गोसावी कुटुंबीयांनी केला. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणी पोलिसांनी गुन्हे दाखल केले असून अधिक तपास करत आहे.











