मोबाईल अॅपच्या माध्यमातून बुकिंग स्वीकारायचे आणि प्रत्यक्षात प्रवाशांकडे मीटरप्रमाणे भाड्याची मागणी करायची याला कंटाळलेल्या प्रवाशांनी आता प्रवासासाठी कार ‘कॅब’चा पर्याय निवडला आहे.
रिक्षाचे मीटर भाडे व कार ‘कॅब’चा दर यात फार तफावत नाही. मात्र सेवेत फरक असल्याने प्रवाशांनी रिक्षाचा प्रवास टाळत हा पर्याय निवडला आहे. यामुळे रिक्षाचालकांची मीटरच्या दरावरून होणारी हुज्जतदेखील बंद झाली. परिणामी ‘कॅब’चे प्रवासी वाढत आहेत.
रिक्षाचालकांकडून होणारी मीटरसक्ती, प्रवासी व चालक यांच्यात होणारे सततचे वादाचे प्रसंग याला कंटाळलेल्या प्रवाशांनी आता कॅबचा पर्याय निवडल्याने रिक्षाच्या प्रवासीसंख्येत घट होण्यास सुरुवात झाली आहे. अनेक रिक्षाचालक ओला, उबेर किंवा रॅपिडो यासारख्या अॅपवर सक्रिय आहेत. मात्र अॅपवर दिसणारे भाडे मान्य नसल्याचे सांगत ते प्रवाशांना मीटरप्रमाणे पैसे देण्यास भाग पाडत आहेत. मीटरचे दर आणि अॅपचे दर यात तफावत असल्याने प्रवाशांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. जर मीटरनेच भाडे घ्यायचे असेल, तर अॅपवरून बुकिंग का स्वीकारता? असा संतप्त सवाल प्रवाशांकडून विचारला जात आहे.
रिक्षाची संख्या – १,४५,०००
दैनंदिन प्रवासी – सुमारे २५ लाख
कॅबची संख्या – ६१,०००
दैनंदिन प्रवासी – सुमारे ५ लाख
रिक्षाचे मीटर दर आणि कॅबचे दर यांच्यात आता फारसे अंतर उरलेले नाही. २० ते ३० रुपयांच्या फरकात प्रवाशांना कॅबमध्ये वातानुकूलित सेवा आणि सुरक्षित प्रवास मिळत आहे. शिवाय अनेक जणांना कॅबमधून लॅपटॉपवर काम करत जाणे सोपे जाते. तेव्हा साहजिकच रिक्षाच्या तुलनेत कॅबचा प्रवास अधिक सुलभ ठरत आहे.
पुण्यातील सार्वजनिक वाहतूक आणि दैनंदिन प्रवासी
पीएमपी बस – सुमारे १२ लाख
रिक्षा – सुमारे २५ लाख
मेट्रो – सुमारे दीड लाख
कॅब – सुमारे ५ लाख
लोकल – ३० ते ३५ हजार
मी ऑफिसला जाता-येता रिक्षाने प्रवास करीत होतो. मात्र रिक्षाचालकांनी मीटरची सक्ती केली. बुकिंग ॲपद्वारे घ्यायचे व प्रत्यक्षात दर मात्र मीटरचे आकाराचे हे एक प्रकारचे बेकायदेशीर कृत्य होते. यावरून काही वेळा वाद झाला. अखेर आता मी कॅबचा पर्याय निवडला आहे. रिक्षाचे मीटर दर व कॅबचे दर यात फार तफावत नाही. मात्र प्रवास तुलनेने अधिक सुरक्षित व आरामदायक होत आहे.










